भाजप कार्यकर्त्याची गोळ्या झाडून हत्या !

Foto

अमेठी : भाजप नेत्या स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय व भाजप कार्यकर्ते सुरेंद्र सिंह यांच्यावर आज पहाटे अज्ञात व्यक्‍तींनी गोळ्या झाडून त्यांची हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. सुरेंद्र सिंह यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.सुरेंद्र सिंह यांनी लोकसभा निवडणुकीदरम्यान काँग्रेसचा पारंपरिक गड मानल्या जाणार्‍या अमेठी मतदारसंघात काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या विरोधात भाजप नेत्या स्मृती इराणी यांचा प्रचार केला होता. 

बरोलिया गावचे माजी सरपंच असलेले सुरेंद्र सिंह यांचा प्रभाव अनेक गावांमध्ये असल्याने त्याचा स्मृती इराणी यांना या निवडणुकीत चांगला फायदा झाला होता. काल शनिवारी रात्री स्मृती इराणी यांचा विजयोत्सव साजरा करून घरी परतल्यानंतर सुरेंद्र सिंह यांच्यावर काही अज्ञात हल्‍लेखोरांनी त्यांच्या बरोलिया येथील राहत्या घरात घुसून त्यांच्यावर गोळ्या झाडल्या. उपचारासाठी त्यांना लखनौ येथील ट्रॉमा सेंटरमध्ये नेण्यात येत असताना रस्त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या हत्येनंतर परिसरात खळबळ उडाली असून, हत्येचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीविरोधात गुन्हा नोंदवला असून, काही संशयितांना ताब्यात घेतले आहे. दरम्यान, घटनास्थळी पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला आहे. सुरेंद्र सिंह यांची हत्या पूर्ववैमनस्य किंवा राजकीय वादातून झाली असावी, असा अंदाज व्यक्‍त करण्यात येत आहे.